Padma Awards 2025:पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर अभिनेते अशोक सराफ यांनी ‘एबीपी माझा’ ला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ” सर्वांचे खूप आभार. भावना अक्षरशः उचंबळून आल्या आहेत. महाराष्ट्र भूषण मिळाला तो राज्याचा झाला. आता संबंध भारताचा पुरस्कार मिळाला. हे पुढचं पाऊल आहे. मला मनापासून आभार मानायचे आहेत. तुम्हाला सगळ्यांना आनंद झाला आहे याचा मला जास्त आनंद आहे. मी चांगलं काहीतरी करतोय यावर शिक्काच मिळाला आहे.”
सिनेसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सम्मानित केले आहे. अशोक सराफ यांना मिळणारा हा सम्मान संपूर्ण महाराष्ट्रवासियांना गर्व वाटेल असा आहे.
महाराष्टासाठी आनंदाची बाब ती म्हणजे मराठीतील विनोदवीर अभिनेता अशोक सराफ (Ashok Saraf) यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे
यावेळी अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनीही प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “हा एकट्या अशोकचा सन्मान नाही तर महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचाही सन्मान आहे. कारण त्यांनी नेहमीच अशोकवर, त्याच्या अभिनयावर प्रेम केलं. अशोकने नेहमी एकाग्रतेने, मेहनतीने अभिनय एके अभिनयच केला. त्याची ही पोचपावती आहे. मी प्रेक्षकांची, जनतेची आणि केंद्र सरकारची खूप ऋणी आहे. आम्हा सर्व कुटुंबियांसाठी खूप आनंदाची बाब आहे.”