अविनाश-ऐश्वर्या यांच्या रीलला चाहत्यांची पसंती मिळते. त्यांचे रील व्हायरलही होतात. तर काही वेळेस त्यांना ट्रोलही केलं जातं. अनेकदा याबाबत त्यांनी भाष्यही केलं आहे. आता मात्र ‘तारांगण’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अविनाश नारकर यांनी रील बनवण्यामागचं खरं कारण सांगून टाकलं आहे. केवळ आनंदासाठी रील बनवत असल्याचं अविनाश यांनी म्हटलं आहे.
- ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहे. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. ऐश्वर्या आणि अविनाश गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहेत. ते दोघेही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेक ट्रेंडिंग गाण्यावर ते रीलही बनवतात.
अविनाश नारकर म्हणाले, “आम्ही आम्हाला जे आवडतं किंवा भावतं तेच करतो. जगण्यामध्ये सध्या तुटकपणा आलेला आहे. त्यामुळे टवटवीत जगणं अनुभवण्याचा आपण प्रयत्न करूया असं माझं आणि ऐश्वर्याचं म्हणणं असतं. आणि ज्या वेळेला आम्हाला हा रसरशीतपणा जाणवतो तेव्हा आम्ही रील करतो. जेव्हा आम्ही एकदम थकून भागून आलेलो असतो. तेव्हा दिवसभराचा कंटाळा घालवण्यासाठी आमच्यासाठी रील हे अतिशय उत्तम असं साधन आहे. आतून ते इतकं उत्स्फुर्तपणे येतं की ते सगळ्यांना भावतं. हे असं आम्हाला जगायचं आहे”.