Satara dhebewadi News : नूतन जिल्हाधिकारी संतोष पाटील
यांनी काल थेट गावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद तर साधलाच, शिवाय तेथे राबविलेले उपक्रम व नावीन्यपूर्ण संकल्पनांचीही माहिती घेतली.
ढेबेवाडी : गेल्या २४ वर्षांत गावात आयुक्त, सचिवांसह
अनेक उच्चपदस्थ अधिकारी येऊन गेले. मात्र, या ना त्या कारणांनी त्या- त्या वेळचे जिल्हाधिकारी मात्र कधीच गावी आले नाहीत, ही खंत मान्याचीवाडीच्या (ता. पाटण) गावकऱ्यांच्या मनात होती. नूतन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी काल थेट गावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद तर साधलाच, शिवाय तेथे राबविलेले उपक्रम व नावीन्यपूर्ण संकल्पनांचीही माहिती घेतली. या वेळी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांसह त्यांच्या समवेत असलेल्या अधिकाऱ्यांना बैलगाडीतून सवाद्य गावात आणून त्यांचे स्वागत केले.
नवनवीन संकल्पना यशस्वीपणे राबवीत देशात चर्चेत आलेल्या, एकाच वर्षात साडेतीन कोटी रुपयांची पारितोषिके पटकाविलेल्या मान्याचीवाडीत राज्यासह परराज्यातून अधिकारी, गावकारभारी आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यास सहलीचा ओघ अनेक वर्षांपासून कायम आहे.
गेल्या २४ वर्षांत अनेक उच्च पदस्थ अधिकारी गावात येऊन गेले. मात्र, जिल्हाधिकारी कधीच आले नव्हते. ग्रामस्थही याबाबत अनेकदा बोलून दाखवत. नूतन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी काल या गावाला भेट देत संवाद साधल्याने ग्रामस्थ आनंदून गेले.
त्यांच्यासमवेत प्रांताधिकारी सोपान टोपे, तहसीलदार अनंत गुरव, गटविकास अधिकारी सरिता पवार, मंडलाधिकारी नागेश निकम, मृदुला कुलकर्णी आदींसह महसूल अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते. सरपंच रवींद्र माने, ग्रामविकास अधिकारी प्रसाद यादव यांनी गावात राबविलेल्या विविध संकल्पनांची माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपणही झाले.
सुधारणेची सूचना करण्यासारखे एकही खराब काम मान्याचीवाडीत दिसत नाही. विशिष्टच नव्हे तर, अनेक क्षेत्रात इथे प्रभावी काम झाले आहे. ग्रामस्थ व कारभाऱ्यांनी आता गावांपुरते मर्यादित न राहता इतर गावांसाठीही मार्गदर्शक बनावे.
– संतोष पाटील, जिल्हाधिकारी