उदय सामंत:छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा गड-किल्ल्यांवर लोककलांच्या माध्यमातून सादर करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही उद्योगमंत्री तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांनी दिली.
विभागीय नाट्यसंमेलन प्रमुख क्षितिज झावरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. बापूसाहेब कांडेकर यांनी स्वागत केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी १०० व्या अ.भा. मराठी विभागीय नाट्यसंमेलनानिमित्त अहिल्यानगरच्या १०० कलाकारांनी नांदी, १०० कलाकारांनी स्वागत नृत्य सादर केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-
किल्ल्यांवर लोककलाकारांच्या माध्यमातून शौर्याची गाथा मांडली गेल्यास नव्या पिढीला प्रेरणा मिळेल. रंगकर्मी जेवढे मोठे होतील तेवढा समाजातील एकोपा टिकून राहील, अशी सूचना अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी मांडली. तोच धागा पकडून मंत्री सामंत म्हणाले, मराठी भाषा संवर्धन आणि लोककलांचे जतन करण्यासाठी लोककला गड किल्ल्यांवरून सादर केल्या तर त्या जगाला दाखविता येतील. असेही ते म्हणाले.
१०० व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनाचे दिवंगत सदाशिव अमरापूरकर नाट्यनगरी येथे रविवारी सायंकाळी उद्घाटन झाले. यावेळी सामंत बोलत होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अहिल्यानगर उपनगर शाखेतर्फे आयोजित या कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त मोहन जोशी, अभिनेते मकरंद अनासपुरे, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. बापूसाहेब कांडेकर, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, हिंद सेवा मंडळाचे शिरीष मोडक, अजित भुरे, दिलीप कोरके, दीपा क्षीरसागर, प्रा. प्रसाद बेडेकर, नाट्य परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सौरउर्जेचा वापर होणार
शहरात नाट्यगृहाची सुविधा करताना व्यावसायिक नाटकांवर होणारा खर्च कमी करणे गरजेचे आहे. त्यासाठी नाट्यगृहांमध्ये सौर ऊर्जेचा वापर होणे गरजेचे आहे. स्थानिक हौशी रंगभूमी कलाकारांना कमी दराने नाट्यगृह उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना त्यांनी महापालिका आयुक्तांना केली. मराठीच्या विकासासाठी सूचना आल्यास त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ.