Gold Market : सोन्याची किंमत गेल्या तीन वर्षांपासून
वाढत असून, फेब्रुवारी महिन्यात २४ कॅरेट सोन्याचा भाव ८५ हजार ७७९ रुपये झाला आहे. १ फेब्रुवारीला ८२ हजार ८२० रुपये असलेला सोने प्रति १० ग्रॅम तीन हजार रुपयांनी महागला आहे.
पुणे : सोन्याची गेल्या तीन वर्षांपासून वाढत असलेली झळाळी आणखी लखलखली आहे. सोन्याच्या भावात होत असलेली वाढ कायम असून, गेल्या दहा दिवसांत सोने प्रति १० ग्रॅम तीन हजार रुपयांनी महागले आहे. एक फेब्रुवारीला ८२ हजार ८२० रुपये असलेला २४ कॅरेट सोन्याचा भाव १० फेब्रुवारीला ८५ हजार ७७९ रुपये झाला आहे.
गुंतवणुकीच्या दृष्टीने सुरक्षित, पारंपरिकदृष्ट्या असलेले महत्त्व आणि दागिन्यांना मिळणारी पसंती असलेल्या सोन्याचे भाव वाढतच आहेत. त्यात आता लग्नसराः इ सुरू झाली आहे. त्यामुळे खरेदी वाढली आहे. सकारात्मक बाब म्हणजे भाव वाढल्यानंतरही खरेदी कायम आहे. त्यामुळे सराफ बाजारात उत्साह दिसून येत आहे. सर्व परिस्थिती सुरळीत झाली तरी सोन्याचा भाव लगेच कमी होण्याची शक्यता नाही. तसेच दोन वर्षांत झालेली वाढ लक्षात घेता भाव यापुढेदेखील तेजीत राहू शकतो. सोने अपेक्षित असलेल्या वेळेपेक्षा कमी वेळेत ७० हजार रुपयांच्या पुढे गेले होते. ८० हजार रुपयांच्या पुढे भाव जातानादेखील तसेच झाले आहे. त्यामुळे यापुढेदेखील तेजी कायम राहील, अशी शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
वर्षभरात २३ हजार रुपयांची वाढ
मार्च २०२३ ते मार्च २०२४ दरम्यान सोने २० टक्क्यांनी महाग झाले आहे. २०२४ अखेरीस सोने ८० हजार रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. त्यानुसार सोने ८० हजार रुपयांच्या पुढे गेले आहे. फेब्रुवारी २०२४शी तुलना केली असता, गेल्या वर्षभरात २४ कॅरेट सोने २२ हजार ९५७ रुपयांनी वाढले आहे, तर चांदी प्रतिकिलो २४ हजार ४०० रुपयांनी महाग झाली आहे.
सोन्याचा भाव वाढण्याची प्रमुख कारणे
• व्याजदरातील अस्थिरता
• अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून वाढलेली खरेदी
• रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम
• अमेरिकी व युरोपीय बाजारपेठेतील मंदीचे वातावरण
• अपरिहार्य कारणांमुळे वाढलेली खरेदी