Virat Kohli Fit for IND vs ENG 2nd ODI: विराट कोहली इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडेत खेळला नव्हता, आता तो दुसरा वनडे सामना खेळण्याची शक्यता आहे. याबाबत भारताचे फलंदाजी प्रशिक्षकांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड संघात वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी (९ फेब्रुवारी) खेळवला जाणार आहे. हा सामना कोटकमधील बाराबाती स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी आणि चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे, पण यामुळे भारतीय संघव्यवस्थापनाची डोकेदुखीही वाढली आहे.
या मालिकेतील पहिला सामना नागपूरला झाला होता, ज्यात भारताने ४ विकेट्सने विजय मिळवला होता. पण या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली खेळला नव्हता.
त्याच्या गुडघ्याला सामन्याच्या आदल्या रात्री सुज आली असल्याचे बीसीसीआयने सांगितले होते. त्यामुळे त्याला पहिल्या सामन्याला मुकावे लागले होते. परंतु, दुसऱ्या सामन्याआधी विराट पूर्ण फिट असल्याची आनंदाची बातमी भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी स्पष्ट केले आहे.
दुसऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला कोटक यांनी सांगितले की ‘विराट खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे. तो सरावासाठी होता आणि तो चांगल्या लयीत होता.’
आता विराट पूर्ण फिट असल्याने जर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले, तर बाहेर कोणाला केले जाणार, याचं उत्तर भारतीय संघव्यवस्थापनाला शोधावे लागणार आहे. पहिल्या सामन्यात विराटच्या अनुपस्थितीत अखेरच्या क्षणी श्रेयस अय्यरला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्यात आले होते.
श्रेयस आधी प्लेइंग इलेव्हन योजनेत नव्हता, पण विराटच्या दुखापतीमुळे सामन्याच्या आदल्या रात्री भारताला त्याच्याबाबत निर्णय बदलावा लागला. श्रेयसने या संधीचा फायदा घेत ३६ चेंडूत ५९ धावांची वादळी खेळीही केली.
तसेच यशस्वी जैस्वालने पहिल्या सामन्यातून वनडे पदार्पण केले होते. त्याला खेळवण्याचा निर्णय आधीच झालेला होता. पण त्याला १५ धावाच करता आल्या. अशात आता दुसऱ्या सामन्यात विराटचे पुनरागमन झाले, तर जैस्वालला खेळवून श्रेयसला बाहेर ठेवणार की जैस्वालला जागा गमवावी लागणार, हे पाहावे लागणार आहे.
या समस्येबाबत सितांशू कोटक म्हणाले, ‘हा निर्णय कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीरचा असणार आहे. मी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही.’
त्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की दुसऱ्या वनडेसाठी रोहित आणि गंभीर यांना प्लेइंग इलेव्हनबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. आता ते कोणाला संघात स्थान देणार, हे पहावे लगणार आहे.