Ladki bahin yojana:मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न खरोखरच अडीच लाखांपेक्षा कमी आहे का? यातील कोणाडेच चारचाकी वाहन नाही का? या प्रश्नांची उत्तरे शासन स्तरावरून शोधली जाणार आहेत.
लाडक्या बहिणीं’साठी कठोर नियम ?
‘माझी लाडकी बहीण’ ही योजना महिलांच्या सशक्तीकरणासाठी सुरू करण्यात आली असली, तरी योजनेचा लाभ गरजू महिलांपर्यंतच पोहोचावा, यासाठी सरकार आता अधिक काटेकोर नियम लागू करण्याच्या विचारात आहे.
योजनेच्या निकषांची कडक अंमलबजावणी होत असल्यामुळे पुढील काही दिवसांत अजूनही काही महिलांकडून पैसे परत करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
१० तारखेपासून घरोघरी चौकशी
महिला व बालकल्याण विभाग आणि जिल्हा प्रशासनाने पडताळणीसाठी व्यापक तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर लाभार्थ्यांची यादी वर्गीकृत केली जात आहे. यानुसार, सोमवार (ता. १०) पासून बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ), पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका घरोघर जाऊन प्रत्यक्ष चौकशी करणार आहेत.
या चौकशीदरम्यान लाभार्थ्यांच्या आर्थिक स्थितीची आणि चारचाकी वाहनांच्या मालकीची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर अपात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी शासनाला सादर केली जाईल.
पडताळणीला गती, बहिणींचा निर्णय बदलला
राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचे लाभार्थी निकषांची पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. चारचाकी वाहन असलेल्या कुटुंबांतील महिलांना हा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. मात्र, सुरुवातीला शासनाच्या या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता.
मात्र, महिला व बालकल्याण विभागाचे सचिव यांनी सोमवारी (ता. ३) अधिकृतपणे पडताळणीच्या सूचना दिल्यानंतर दोनच दिवसांत परिस्थिती बदलली. अपात्र ठरण्याच्या भीतीने अनेक बहिणींनी स्वतःहून योजना सोडण्याचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेतील लाभार्थ्यांची प्रशासनाकडून चौकशी केली जाणार आहे. विशेषतः ज्या कुटुंबांकडे चारचाकी वाहने आहेत, त्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. पडताळणी होण्याच्या भीतीने अनेक महिलांनी योजनेचा लाभनाकारायला सुरुवात केली असून, आतापर्यंत तब्बल ३८ महिलांनी मिळालेले पैसे शासनाला परत केले आहेत.
प्रारंभी राज्यस्तरावरून प्राप्त वाहनधारकांच्या यादीत लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी किती हे फिल्टर केले जाईल. त्यानंतर ज्यांच्या नावात किंवा इंग्रजी अक्षरात चूक राहिल्याने ऑनलाइन यादीत नावे दिसणार नाहीत, त्यांची पडताळणी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन केली जाणार आहे. शासनाने योजनेसंदर्भात काढलेल्या शासन निर्णयातील निकषांनुसार पात्र नसताना देखील ज्यांनी अर्ज केले, त्यांचा लाभ बंद करण्यासाठी ही पडताळणी होत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ‘शी बोलताना सांगितले.