Chhatrapati Shivaji Maharaj Statue at Malvan Fort: राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा ६० फूट उंच तलवारधारी पुतळा उभारला जात आहे. २४.७२ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे.
मालवण (सिंधुदुर्ग): मालवण येथील ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची ६० फूट उंच पूर्णाकृती मूर्ती उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पासाठी तब्बल २४ कोटी ७२ लाख रुपये (जीएसटीसह) खर्च अपेक्षित आहे. मूर्तीची स्थापना १० एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे.
पुतळ्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
राजकोट किल्ल्यावर उभारण्यात येणारी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तलवारधारी असून ती कमीत कमी १०० वर्षे टिकेल, अशा प्रकारे डिझाइन करण्यात आली आहे. मूर्तीच्या तळाचा आरसीसी प्लॅटफॉर्म ३ मीटर उंच असून, त्यासाठी गंज-प्रतिरोधक स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात येत आहे.
पुतळा स्थापनेनंतर पुढील दहा वर्षे तिच्या देखभालीसाठी ठेकेदार नेमण्यात आला आहे. पुतळ्याचे थर्माकोल मॉडेल तयार झाले असून, सध्या कांस्याचे काम २० फूटपर्यंत पूर्ण
झाले आहे.
पुतळ्याचे डिझाइन प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांच्या राम सुतार आर्ट क्रिएशन्सद्वारे करण्यात आले आहे. मूर्ती कांस्य धातूपासून तयार होणार असून, तिचा आधारसंरचना संपूर्ण स्टेनलेस स्टीलपासून तयार करण्यात येत आहे.
पुतळा उभारणीसाठी नवीन निर्णय
४ डिसेंबर २०२३ रोजी अनावरण करण्यात आलेला पुतळा आठ महिन्यांनंतरच म्हणजेच २६ ऑगस्ट २०२४ रोजी कोसळला. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप झाले. पुतळा निर्मिती सल्लागार आणि मूर्तिकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले. २६ ऑगस्ट २०२४ रोजी दुर्घटनेनंतर महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन मूर्ती उभारण्याचा निर्णय घेतला. २५ सप्टेंबर २०२४ रोजी प्रशासनाने या प्रकल्पाला मंजुरी दिली.
पर्यटकांमध्ये प्रचंड उत्साह
मूर्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील पर्यटनाला अधिक चालना मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी उभारलेल्या मूर्तीला पाच लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली होती.प्रकल्पामुळे पर्यटकांची संख्या वाढून स्थानिक अर्थव्यवस्थेला फायदा होईल, अशी अपेक्षा आहे