Sanjay Raut On Sharad Pawar Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नवी दिल्लीत शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केलीय.
Sanjay Raut: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्याचे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्यानं महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांनी केलेल्या सत्कारानंतर संताप व्यक्त केला आहे. शरद पवारांनी शिंदेंचा नाही तर अमित शहांचा सत्कार केलाय. आम्हाला दिल्लीतलं राजकारण माहिती नाही पण आम्हालाही राजकारण कळतं पवारसाहेब अशा शब्दात संजय राऊत यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
महादजी शिंदे यांनी दिल्लीचं तख्त मराठ्यांनी राखलं होतं. त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार एकनाथ शिंदेंना शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आला. नवी दिल्लीत हा पुरस्कार सोहळा झाला. या सत्कारावरून संजय राऊत यांनी संताप व्यक्त करताना इशारा दिलाय. संजय राऊत म्हणाले की, शरद पवार यांनी शिंदेंचा नव्हे तर अमित शहांचा सत्कार केलाय. अमित शहांच्या सहकार्यानं त्यांनी महाराष्ट्राचे तुकडे केले. शिंदेंचा पक्ष हा अमित शहांचा पक्ष आहे.
आम्हाला दिल्लीतलं राजकारण माहिती नाही आणि कळत नाही. पण आम्हालाही राजकारण कळतं पवारसाहेब. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, उद्योग पळवून नेणाऱ्या अमित शहांचा सत्कार आहे हा. शिंदे हे अमित शहांचे प्रतिक आहेत. महाराष्ट्र कमजोर केला त्यांना सन्मानित का करता? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. शरद पवार यांनी शिंदेंचा सत्कार केल्यानं आम्हाला वेदना झाल्या असं म्हणत संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केलीय.